श्री गणपती आरती

सुखकर्ता दुःखहर्ता...

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती ॥ जय देव ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुम केशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ जय देव ॥

लंबोदर पितांबर फणिवरबंधन ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयन ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ जय देव ॥

दुर्गा आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी...

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी ।
वारी वारी जन्म मरणांते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥१॥

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।
सुरवर ईश्वर वंदित तारक संजीवनी ॥धृ॥

तुझवीण सुवेणी पाहता तुज असे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोले काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥३॥

श्री दत्त आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा...

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्यान ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ जय देव ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैसी कळे ही मात ।
पराही परतली कैसा हा हेत ।
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥ जय देव ॥

दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिला ।
जन्म मरणाचा फेरा चुकविला ॥ जय देव ॥

दत्त दत्त असे लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ।
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ॥ जय देव ॥

श्री स्वामी समर्थ आरती

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था...

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ॥धृ॥

छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी ।
जग उद्धारासाठी राया तू फिरसी ।
भक्तवत्सल खरा तू एक होसी ।
म्हणुनी शरण आलो तव चरणासी ॥

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ॥

त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार ।
त्याची काय वर्णू लीला पामर ।
शेषादिक क्षीणले नलगे त्या पार ।
तेथे जडमूढ कैसा करू मी विस्तार ॥

देवाधिदेवा तू स्वामी राया ।
निरंतर मुनीजन ध्याती भावे तव पाया ।
तुझसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारी तू स्वामी राया ॥

अघटित लीला करुनी जडमूढ उद्धारिले ।
कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे ।
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले ।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे ॥

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण...

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगन आनंदे पूजन ।
भावे ओवाळीन म्हणे नामा ॥

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बंधु सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्व मम देवदेव ॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेत समर्पयामि ॥

अच्युतं केशवं राम नारायणम् ।
कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे ।
श्रीधर माधवं गोपिकावल्लभम् ।
जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

WhatsApp वर संपर्क करा